Cotton Seed खानदेशात कापूस बियाणे विक्री गुरुवारपासून (ता. १५) सुरू झाली. परंतु कापसाचे कमी दर, पावसाबाबत अनिश्चित स्थिती, दर्जेदार कापूस वाणांचा अभाव, तोटा या कारणांनी अनेक शेतकरी कापूस लागवड कमी करीत आहेत. तर काही शेतकरी लागवड टाळत आहेत. यामुळे कापूस बियाणे विक्रीसंबधी खानदेशात पहिल्याच दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अनेक विक्रेत्यांनी कापूस बियाण्यांचा पुरवठा करून घेणेही टाळले आहे. वितरकांकडे कापूस बियाणे दाखल झाले आहे. मागणी असलेल्या काही विशिष्ट वाणांचा पुरवठा वितरकांनी करून घेतला आहे. परंतु ज्या कापूस वाणांना मगणी नसते, त्याचा पुरवठा वितरकही यंदा टाळत आहेत. खानदेशात यंदा कापूस लागवडीत मोठी घट शक्य आहे.
त्यात जळगावातील लागवड मोठ्या प्रमाणात कमी होईल. जळगाव जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. २०२४-२५ मध्ये त्यात मोठी घट झाली व लागवड पाच लाख ११ हजार हेक्टरवर खाली आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
खानदेशातील कापसाखालील एकूण क्षेत्र नऊ लाख हेक्टरवरून सव्वाआठ लाख हेक्टरवर आले. त्यात बागायती कापूस लागवड खानदेशात केली जाते. पण त्यातही घट होईल. कारण अनेकांनी पपई, केळीखाली आपले क्षेत्र आणले आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा चार लाख ८० हजार ते चार लाख ९० हजार हेक्टरवर एकूण कापूस लागवड अपेक्षित आहे. यात पूर्वहंगामी लागवड मागील हंगामाच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी कमी होईल, असेही दिसत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कापूस लागवड २५ मे नंतरही अनेक जण करतात. यामुळे सध्या शेतांत मशागत, ‘ठिबक’ची व्यवस्था केली जात आहे. यामुळे २० मे नंतर कापूस बियाणे विक्रीस प्रतिसाद मिळू शकतो, अशीही स्थिती आहे.
खानदेशात सुमारे ४२ ते ४४ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज असणार आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ लाख कापूस बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे. एकाच वेळी एवढा पुरवठा होणार नाही. पाऊस आल्यानंतर कमाल पुरवठा लक्ष्यांक पूर्ण होईल, असे संकेत आहेत. सध्या वितरकांकडे पूर्वहंगामी (बागायती) व मागणी असलेले कापूस वाण आहेत